
सेवा, सुरक्षा आणि सन्मानाचा संदेश डिजिटल माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचा संकल्प; युवक, पत्रकार, डिजिटल क्रिएटर्स व गोभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
पुणे, २८ सप्टेंबर २०२६ (SDNA) — गोमातेची सेवा, सुरक्षा आणि सन्मानाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘गो सन्मान आवाहन अभियान’च्या वतीने पुण्यात विशेष सोशल मीडिया सुगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वरूप वर्धिनी, १६१ शनिवार पेठ, पारगे चौक, सदानंद नगरसमोर, मंगळवार पेठ, पुणे येथे ही सुगोष्ठी होणार आहे.
डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरावर विचारमंथन
फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स (X), व्हॉट्सॲप तसेच विविध डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आज जनजागृतीची प्रभावी साधने बनली आहेत. या माध्यमांचा सकारात्मक आणि सेवाभावी पद्धतीने वापर करून गोसेवा, गोवंश संरक्षण-संवर्धन आणि गोमातेच्या सन्मानाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सुगोष्ठीत चर्चा होणार आहे.
अभियानाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी सोशल मीडिया क्षेत्रातील युवक-युवती, पत्रकार, वार्ताहर, टीव्ही चॅनल प्रतिनिधी, यूट्यूबर्स, व्हिडिओ निर्माते, रील्स व शॉर्ट व्हिडिओ क्रिएटर्स, ग्राफिक डिझायनर्स, डिजिटल मीडिया कार्यकर्ते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गोसेवेत योगदान देऊ इच्छिणाऱ्या गोभक्तांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावांत आणि घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न
‘गो सन्मान आवाहन अभियान’च्या माध्यमातून गोमातेला सेवा, सुरक्षा आणि सन्मान मिळावा, तसेच गोवंशाच्या संरक्षण व संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी विविध स्तरांवर उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या जनजागृतीला डिजिटल माध्यमांची व्यापक ताकद जोडून अभियानाची माहिती गावागावांत आणि घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
रील्स, व्हिडिओ आणि डिजिटल कंटेंटवर मार्गदर्शन
सुगोष्ठीत अभियानाचा सोशल मीडियावर प्रभावी प्रचार कसा करावा, जनजागृतीपर व्हिडिओ व रील्सची निर्मिती कशी करावी, अभियानाशी संबंधित संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवावेत, स्थानिक पातळीवरील गोसेवेचे कार्य डिजिटल माध्यमातून कसे मांडावे, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या समन्वयातून व्यापक जनजागृती कशी साधता येईल, यावरही विचारविनिमय होणार आहे.
डिजिटल कौशल्य गोसेवेसाठी समर्पित करण्याचे आवाहन
सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता जनजागृती आणि सामाजिक कार्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरावे, हा या सुगोष्ठीमागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोशल मीडिया व्यवस्थापन, पत्रकारिता, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाइन, फोटोग्राफी, कंटेंट रायटिंग किंवा डिजिटल प्रचाराचे कौशल्य असलेल्या व्यक्तींनी आपल्या कौशल्याचा उपयोग या अभियानासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे येथील गो सन्मान आवाहन अभियान टीमने राष्ट्रप्रेमी नागरिक आणि गोभक्तांनी एकजुटीने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.