Saturday, October 10

ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्यावे, अभिजीत दीपकेंचा उपरोधिक टोला; म्हणाले, “अशा राज्यांतही विजय मिळवला जिथे मोदीही जिंकवू शकले नसते”

मुंबई, १ ऑक्टोबर (SDNA) — मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत आंदोलनाची घोषणा करणारे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी व्यंगात्मक शैलीत केली.

दीपके म्हणाले, “भारत रत्न तर द्यायलाच हवे. अशा अशा राज्यांमध्ये विजय मिळवून दिला, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विजय मिळवता आला नसता. आज भाजप नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकत नाही, तर ज्ञानेश कुमार यांच्या कॅल्क्युलेशनवर जिंकत आहे.”

राजीनाम्याची मागणी

दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास देशभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ऑक्टोबरच्या अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली.

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात होणाऱ्या विरोधकांच्या आंदोलनात त्यांचा पक्ष सहभागी होणार नाही. त्यांचे आंदोलन स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमर अब्दुल्लांचाही उपरोधिक उल्लेख

ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न देण्याबाबतचा हा उपरोध पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही ज्ञानेश कुमार यांना पद्म पुरस्कार देण्याच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा साधला होता.

अब्दुल्ला यांनी व्यंगात्मक टिप्पणी करत ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याचा दावा करत अब्दुल्ला यांनी पद्मभूषणऐवजी भारतरत्न देण्याची उपरोधिक सूचना केली होती.

Leave a Reply