
परिनाज धालीवाल, माहेश्वरी चौहान आणि रायझा ढिल्लों यांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा पदकावर कब्जा
आयची-नागोया (जपान), 23 सप्टेंबर 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताच्या महिला नेमबाजांनी प्रभावी कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली. महिलांच्या स्कीट सांघिक स्पर्धेत परिनाज धालीवाल, माहेश्वरी चौहान आणि ऑलिम्पियन रायझा ढिल्लों यांच्या भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले.
आयची-नागोया येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय त्रिकुटाने सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम क्रमवारीत स्थान मिळवले. परिनाज धालीवाल आणि रायझा ढिल्लों यांनी प्रत्येकी 125 पैकी 111 लक्ष्य भेदले. माहेश्वरी चौहानने 125 पैकी 109 गुणांची नोंद केली.
या तिन्ही खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर भारताने महिलांच्या स्कीट टीम स्पर्धेत कांस्यपदक निश्चित केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत दमदार उपस्थिती नोंदवली. नेमबाजीतील या कांस्यपदकामुळे भारताच्या पदक मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.
परिनाज, माहेश्वरी आणि रायझा यांच्या संयमी आणि अचूक नेमबाजीने भारतीय संघाला पोडियमपर्यंत पोहोचवले असून, स्पर्धेतील भारताच्या पुढील कामगिरीकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
(SDNA)