
निशिन (जपान), १ ऑक्टोबर। आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा तब्बल १२४ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
सेमीफायनलमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६९ धावा उभारल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची संधीच दिली नाही. श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या ४५ धावांवर ९.५ षटकांत संपुष्टात आला.
ईशान किशनची तुफानी खेळी
भारताच्या डावात ईशान किशनने शानदार फलंदाजी करत ४६ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला संयमी फलंदाजी करणाऱ्या ईशानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक रूप धारण केले आणि अवघ्या पुढील १३ चेंडूंमध्ये ३० धावा ठोकल्या.
त्याला वैभव सूर्यवंशीनेही चांगली साथ दिली. वैभवने २१ चेंडूंत ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले.
सुरुवातीला भारताला धक्के
भारताची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अभिषेक शर्मा ७ धावांवर, संजू सॅमसन ७ धावांवर, तर कर्णधार श्रेयस अय्यर १३ धावांवर बाद झाले. वैभव सूर्यवंशीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाद झाल्यानंतर ईशान किशनने भारतीय डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
अक्षर पटेलने ८, तिलक वर्माने २ आणि शिवम दुबेने ३ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ७ धावांचे योगदान दिले.
बुमराहच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेला धक्का
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला मोठा धक्का दिला. त्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही दबाव कायम ठेवला.
श्रीलंकेचे तीन फलंदाज अवघ्या २ धावांवर बाद झाले. १८ धावांपर्यंत निम्मा संघ तंबूत परतला होता, तर ३३ धावांवर सात विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेचा पराभव जवळपास निश्चित झाला.
श्रीलंकेकडून नविंदू फर्नांडोने सर्वाधिक १५ धावा केल्या. कर्णधार सहनला केवळ ९ धावा करता आल्या. तब्बल सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
भारताकडून जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.
आता पाकिस्तानविरुद्ध सुवर्णपदकाची लढत
श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवत भारताने अंतिम फेरी गाठली आहे. आता सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वीच सुवर्णपदक जिंकले असून आता पुरुष संघाकडूनही सुवर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.
(SDNA)