Friday, October 30

दिल्लीतील ‘दोन नेहा बोरा’ प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा; हमशकल महिलेमुळे पोलिसांचा गोंधळ!

आर. के. आश्रम मेट्रो स्थानकावर नेहा बोरा समजून दुसऱ्याच महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न; खरी नेहा कनॉट प्लेसमध्ये आंदोलनात सहभागी

(SDNA) नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासारखी दिसणारी महिला पोलिसांच्या नजरेस पडल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आर. के. आश्रम मेट्रो स्थानकावर नेहा बोरा समजून एका हमशकल महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, खरी नेहा बोरा कनॉट प्लेस परिसरात आंदोलनात सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आर. के. आश्रम मेट्रो स्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी लाल रंगाचे कापड, मास्क आणि काळा चष्मा घातलेल्या एका महिलेला नेहा बोरा समजण्यात आले. मात्र, ती नेहा यांची हमशकल असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

कनॉट प्लेसमध्ये दिसल्या खऱ्या नेहा बोरा

दरम्यान, नेहा बोरा या कनॉट प्लेस परिसरात आंदोलकांसोबत असल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून समोर आले. त्यानंतर आर. के. आश्रम स्थानकावरील महिलेच्या ओळखीबाबतचा संभ्रम दूर झाला. वृत्तानुसार, नंतर नेहा बोरा यांना विजय चौकाजवळ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान सुमारे ५० जणांना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली.

‘दोन नेहांची कहाणी’ म्हणत दिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर नेहा बोरा यांनी स्वतःसारखी दिसणाऱ्या महिलेबरोबरचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. ‘दोन नेहांची कहाणी’ असे म्हणत त्यांनी हा प्रकार कोणत्याही नियोजित रणनीतीचा भाग नसून केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी पोलिसांच्या ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी या घटनेला विलक्षण योगायोग म्हटले. दिल्लीतील ‘दोन नेहा बोरा’ प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले असून, एका व्यक्तीच्या हमशकलमुळे निर्माण झालेल्या या गोंधळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply